चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस पेटली; ५० प्रवाशांचे प्रसंगावधानाने प्राण वाचले

 0
चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस पेटली; ५० प्रवाशांचे प्रसंगावधानाने प्राण वाचले

सह्याद्री LIVE | निगडीवरून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणारी पीएमपीएलची बस चाकण औद्योगिक वसाहतीतील महेंद्रा कंपनीसमोर अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस कामगारांसाठी विशेष फेरी म्हणून सुरू करण्यात आली होती. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. बसमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,बसच्या पुढील भागातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच ज्वाळांनी बसला वेढले.बस इलेक्ट्रिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून,शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, औद्योगिक वसाहतीत कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. संबंधित यंत्रणेकडून घटनेचा तपास सुरू असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पीएमपीएलच्या बसची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.