केतन अग्रवाल हत्या प्रकरण: खटला जलदगती न्यायालयात चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

 0
केतन अग्रवाल हत्या प्रकरण: खटला जलदगती न्यायालयात चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्या प्रकरणाचा तपास आणि खटला आता अधिक वेगवान होणार आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवला जाणार असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाला निर्देश दिले आहेत.

​मुख्यमंत्र्यांची घेतली भेट -

​केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी आर्त हाक त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. विशाल अग्रवाल यांच्या भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला.

​"अग्रवाल कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. या प्रकरणातील दोषींना कठोरतम शिक्षा व्हावी, यासाठी प्रशासन आणि गृह विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे," असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

*​उज्वल निकम यांची संमती -

​अग्रवाल यांच्या मागणीचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. तसेच, राज्याचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली. विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंबंधीचे आवश्यक निर्देश जारी करण्यात आले असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली संमती दर्शवली आहे.

​या निर्णयामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने होऊन पीडित कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.