जमीन व्यवहारात दोन कोटीची फसवणूक;दोन जणांवर गुन्हा दाखल; एकास अटक

चाकण ( पुणे ) : जमीन विकसित करून प्लॉट पाडून विक्री करण्याचा एकत्र व्यवहार केला,परंतु ती जमीन परस्पर दुसऱ्याला देऊन एक कोटी पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाणेकरवाडी (ता.खेड ) येथे (४/११/२०२१ - २८/१२/२०२३) दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.
शिवाजी रामजी बिरादार (वय.६८ वर्षे,शिवाजी पार्क,चिंचवड,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) विवेकानंद वसंत शेडे (मूळ रा.नाणेकरवाडी, सध्या रा.टिळक रोड,पुणे);२) सलीम मुबारक शेख ( वय.५७ वर्षे,सध्या रा.शेडे यांचे फार्म, नाणेकरवाडी,मुळ रा,हडपसर) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विवेकानंद शेडे याच्या मालकीची नाणेकरवाडी येथे गट नं. २१४/१ क्षेत्र १ हेक्टर ४१ आर जमीन आहे.ही जमीन विकसीत करुन प्लॉट करून विक्री करण्यासाठी फिर्यादी शिवाजी बिरादार यांच्याशी व्यवहार करुन शेडे आणि शेख यांनी २ कोटी रुपये घेतले आहे.जमीनीची लेव्हल करून त्यावर डांबरी रस्ते,ड्रेनेज लाईन करत जमिनीचे एक - दोन गुंठ्याचे प्लॉट तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली.परंतु विक्री करण्यासाठी बिरादार यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता उत्तम वसंत कुसाकर यांना ही जमीन विक्री करण्यासाठी दिली.या प्लॉटिंगसाठी लागणारे शासकीय परवानगी न घेता बेकायदेशिररित्या प्लॉट विक्री करीत आहे.बिरादार यांच्याकडून शेडे आणि शेख यांनी व्यवहारापोटी घेतलेले दोन कोटी रुपये आणि प्लॉटिंगसाठी खर्च झालेले १५ लाख रुपये असे तडजोडीने ०२ कोटी १५ लाख रुपये बिरादार यांना परत देण्याचे शेडे आणि शेख यांनी मान्य करून तसा लेखी करारनामा नोटरीवर दिला.वरील रक्कमेतील १ कोटी रुपये परत दिले मात्र १ कोटी १५ लाख रूपये न दिल्याने शेडे आणि शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील शेख याला अटक करण्यात आली आहे.