'एक पेड़ माँ के नाम'मोहीमअंतर्गत;३०० हून अधिक वृक्षांची लागवड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन
आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात केंद्र सरकारच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि 'महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग' (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलपती व कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांच्या प्रेरणेने, तसेच कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत 'मॅनेट'च्या ३०० कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी विद्यापीठ परिसरात कांचन, बहावा, गुलमोहर आणि पाम (ताड) यांसह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
"पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपली जीवनशैली बनली पाहिजे. हरित परिसर निर्मितीसाठी आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. भविष्यातही विद्यापीठातर्फे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले जातील." — प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर (प्र-कुलगुरू, एमआयटी एडीटी)
लघुपटांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती -या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण जनजागृतीलाही विशेष प्राधान्य देण्यात आले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या तीन पर्यावरणविषयक लघुपटांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.
‘पृथ्वी आपली, जबाबदारीही आपली!’ – निसर्ग संवर्धनाचा संदेश. -
‘बिन इट राइट!’ – कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व.
‘गिरिमित्र’ – शाश्वत जीवनशैलीवर भाष्य.
या तिन्ही लघुपटांच्या माध्यमातून उपस्थितांना पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती -
याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. डॉ. सूराज भोयर, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचे प्राचार्य डॉ. अमोल देशमुख, सुरक्षा व दक्षता संचालक कर्नल प्रशांत वाघमारे, उपकुलसचिव डॉ. हनुमंत पवार, सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.