महाळुंगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन एकर जागा मंजूर

गणेश बोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; PMRDAची तत्त्वतः मान्यता

 0
महाळुंगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन एकर जागा मंजूर

चाकण | नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, म्हाळुंगे इंगळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सुमारे दोन एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.

म्हाळुंगे येथील गट क्रमांक ३७३/१/अ मधील २.१२.०० हेक्टर पोटखराब क्षेत्रापैकी ०.८० हेक्टर म्हणजेच सुमारे दोन एकर जागा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्यास PMRDAने मान्यता दिली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार ही प्रक्रिया पुढे आली आहे.

PMRDAचे महानगर आयुक्त यांच्या मान्यतेनंतर सहआयुक्त पूनम मेहता यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जागेचे प्रत्यक्ष हस्तांतरण पूर्ण होणार आहे.

महाळुंगे तसेच चाकण औद्योगिक परिसरातील वाढती लोकसंख्या, कामगारांची संख्या आणि आरोग्य सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. जागा उपलब्ध झाल्याने आता केंद्राच्या इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पाठपुराव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यानंतर महाळुंगे, नाणेकरवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांसह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.