खराबवाडीचा पाणीप्रश्न ऐरणीवर;गणेश बोत्रेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
संयुक्त बैठकीत काही तांत्रिक समस्या जागेवरच निकाली,उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश
चाकण | खराबवाडी परिसरातील एमजीपीएलच्या पाणीपुरवठा पाइपलाइनमध्ये वारंवार होणारे बिघाड आणि त्यामुळे ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला आहे. या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत गणेश बोत्रे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही तांत्रिक अडचणींचे बैठकीतच निराकरण करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, मेदनकरवाडीचे पंचायत समिती सदस्य महिंद्र मेदनकर, पंचायत समितीचे संबंधित अधिकारी, एमजीपीएलच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि खराबवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा, पाइपलाइनमधील गळती आणि तांत्रिक बिघाडांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल गणेश बोत्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर कोणतीही टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
गणेश बोत्रे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत काही तांत्रिक अडचणी जागेवरच दूर केल्या. तर उर्वरित दुरुस्तीची कामे आणि पाइपलाइनमधील तांत्रिक त्रुटी येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करून खराबवाडीचा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने आणि नियमित सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, खराबवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही गणेश बोत्रे यांनी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे आता संबंधित यंत्रणा दिलेल्या निर्देशांची कितपत अंमलबजावणी करते आणि खराबवाडीकरांचा पाणीप्रश्न प्रत्यक्षात कधी सुटतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.