अॅमेझॉनच्या गोदामावर 'बीआयएस'चा छापा; दोन हजार ५६५ बिनप्रमाणित वस्तू जप्त; आंबेठाण येथे कारवाई

चाकण ( पुणे ) : भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चाकण औद्योगिक वसाहतच्या आंबेठाण (ता.खेड ) येथील अॅमेझॉनच्या गोदामावर (दि.४ एप्रिल) रोजी धडक कारवाई करत दोन हजार ५६५ बिनप्रमाणित ग्राहक उत्पादने जप्त केली आहेत.
छाप्यावेळी जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये विद्युत व अविद्युत खेळणी,ज्यूसर मिक्सर, एलईडी बल्ब,स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या,सीलिंग फॅन,सॅनिटरीनॅपकिन्स,बेबी डायपर्स,स्पोर्ट्स शूज आणि इलेक्ट्रिक केटल्स यांचा समावेश होता.या सर्व वस्तूंना 'बीआयएस' प्रमाण अनिवार्य असतानाही त्या बिनप्रमाणित अवस्थेत विक्रीसाठी साठविण्यात आल्या होत्या.
केंद्र सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांतर्गत सध्या ७६९ उत्पादने अनिवार्य करण्यात आली आहेत. त्यामुळे बीआयएस परवाना नसलेल्या कोणत्याही वस्तूचे उत्पादन, विक्री अथवा आयात कायदेशीरपणे निषिद्ध आहे. अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करण्यात येते. कोणतेही उत्पादन खरेदी करताना 'बीआयएस केअर' अॅपचा वापर करून त्याचे प्रमाणन वैध आहे की नाही हे तपासावे. बोगस आयएसआय चिन्ह, हॉलमार्क किंवा नोंदणी चिन्हाचा वापर असल्याचा संशय आला, तर 'बीआयएस'कडे तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन 'बीआयएस'ने नागरिकांना केले आहे.