राजगुरुनगर सहकारी बँकेला 'एफएसडब्ल्यूएम' दर्जा प्राप्त

 0
राजगुरुनगर सहकारी बँकेला 'एफएसडब्ल्यूएम' दर्जा प्राप्त

राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर सहकारी बँक आता रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार 'फिनान्शियली साउंड अँड वेल मॅनेज्ड बँक' (एफएसडब्ल्यूएम) म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक झाली आहे. त्यामुळे बँक व्यवसाय विस्तारास चालना मिळणार आहे,असे बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले.

  राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या प्रमाणित आर्थिक पत्रकांच्या निष्कर्षांनुसार बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक असल्याचा ठराव संचालक मंडळाने मंजूर केला.तसेच,रिझर्व बँकेच्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक वर्गीकरण करण्याच्या नियमांचे अवलोकन करून 'एफएसडब्ल्यूएम' बाबतच्या सुधारित निकषांचे पालन केल्याचा ठराव केला.

या बैठकीला अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे आणि अन्य संचालक व अधिकारी उपस्थित होते.

राजगुरुनगर सहकारी बँक इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी प्रस्ताव देणारी उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिली नागरीसहकारी बँक आहे. तसेच दिवसेंदिवस व्यवसायात होणाऱ्या वाढीच्या आणि आर्थिक गुणवत्तेच्या जोरावर बँक शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळविण्याकामी मार्गक्रमण करत आहे. बँकेचा २९५२ कोटींचा व्यवसाय पूर्ण झाला असून, अल्पावधीतच बँक ३००० कोटींचा टप्पा गाठेल. बँक एक दोन महिन्यातच ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठेल.

सलग दुसऱ्या वर्षी नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे. नुकतेच बँकेच्या १८व्या शाखेचे उद्घाटन झाले असून येत्या वर्षभरात बँक अजून २ शाखा उघडेल. तंत्रज्ञानात बँक अग्रेसर असून दैनंदिन डिजिटल ट्रान्झेक्शन सुमारे ५० हजार होत आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.

* एफएसडब्ल्यूएम'मुळे बँकेचा फायदा -

कार्यक्षेत्र राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यांत व्यवसायाच्या संधी.

नियमांस अधीन राहून स्वेच्छेने शाखा विस्तार करता येईल.

नवीन सेफ डिपॉझिट लॉकरसह एक्स्टेंशन काउंटर उघडता येतील. एक्स्टेंशन काउंटरचे ठरावीक व्यवसायवाढीनंतर शाखेत रूपांतर करता येईल. ऑफसाइट एटीएम सुविधा सुरू करता येईल.

बँकेला शाखा स्थलांतर करता येईल.