सावरदरी ग्रामपंचायतकडून दिव्यांग लाभार्थ्यांना ९ लाख ४६ हजार ३१७ रुपयांच्या निधीचे वाटप
खेड(पुणे) | दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे,या सामाजिक बांधिलकीतून ग्रामपंचायत सावरदरी(ता. खेड, जि. पुणे) यांच्या वतीने ५% दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत तब्बल ९ लाख ४६ हजार ३१७ रुपये निधीचे १० पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचे वितरण धनादेशाद्वारे करण्यात आले.या उपक्रमामुळे गावातील दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सदस्य अश्विनी सोमनाथ तरस,माजी सरपंच संदीप बाळासाहेब पवार,प्रशासक तुषार अरविंद साळंके,ग्रामपंचायत अधिकारी देविदास आजिनाथ आतार यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.दिव्यांग लाभार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.
ग्रामपंचायत सावरदरीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी निधीचे प्रभावी वितरण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला."दिव्यांगांचा सन्मान, स्वावलंबनाचा ध्यास आणि सर्वसमावेशक ग्रामविकासाचा संकल्प!"