दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला;चाकण पोलिसांचा प्रत्युत्तरादाखल गोळीबार

चाकण ( पुणे ) बहुळ ( ता.खेड ) गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली आहे.
बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकूने हल्ला करून आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती.त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. मात्र,दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले आहेत.स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त डॉ. पवार यांनी प्रत्युत्तरादाखल दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सराईत गुन्हेगार सचिन भोसले याच्या पायाला लागली असून, त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले आहे. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले.