निगडी प्रभागात पाणीपुरवठ्याचे तीन तेरा; आयुक्तांकडे तक्रार;नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांची कारवाईची मागणी

 0
निगडी प्रभागात पाणीपुरवठ्याचे तीन तेरा; आयुक्तांकडे तक्रार;नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांची कारवाईची मागणी

सह्याद्री LIVE | पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ मधील सेक्टर नं. २२, यमुनानगर व साईनाथनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी तोही नियमित,पुरेशा दाबाने व ठरलेल्या वेळेत होत नसल्याची तक्रार नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्याकडे केली आहे.

या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक वेळा कमी दाबामुळे वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणी सोडण्याच्या वेळा विनाकारण बदलल्या जात असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोपही केंदळे यांनी केला आहे.

वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार व निष्काळजीपणा यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे केंदळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

“नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवी आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

यावर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडून अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केली जाईल,असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान,पाणीप्रश्न लवकर न सुटल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिला आहे.