सोसायटी प्रतिनिधींच्या मागणीवरून जिल्हा परिषद निधीतून ३० लाखांचा निधी मंजूर
कोये, कुरकुंडी आणि पिंपरी बुद्रुकमधील मंदिर सभामंडप कामांना प्रशासकीय मान्यता
खेड (पुणे) | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीदरम्यान ‘अ’ वर्ग सोसायटी मतदारसंघातील प्रतिनिधींनी केलेल्या मागण्या अवघ्या काही दिवसांत पूर्ण करत जिल्हा परिषद सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला आहे. कुरकुंडी, कोये आणि पिंपरी बुद्रुक या तीन गावांतील मुकाई देवी मंदिर, सावता महाराज मंदिर तसेच बहुउद्देशीय इमारतींच्या सभामंडपासाठी जिल्हा परिषद निधीतून एकूण ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यतेची पत्रे ग्रामस्थ व विकास सोसायटी संचालकांकडे सुपूर्द करण्यात आली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, तालुका युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर आणि आंबेठाणचे आदर्श माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर यांच्या हस्ते संबंधित संस्थांचे संचालक आणि ग्रामस्थांना या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या.
* तीन महत्त्वाच्या विकासकामांना प्रत्येकी १० लाखांचा निधी -
कुरकुंडी: श्री मुकाई देवी मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये
पिंपरी बुद्रुक (लादवड): संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये
कोये: सुरू असलेल्या मंदिर सभामंडप व बहुउद्देशीय इमारतीसाठी १० लाख रुपये
* विकासकामांना गती -
कोये येथील बहुउद्देशीय इमारतीचे मोठे काम सध्या सुरू असून, यासाठी शरद बुट्टे पाटील यांनी यापूर्वीच २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता नव्याने १० लाख रुपये मिळाल्याने हे काम वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे.
* ग्रामस्थ व सोसायटी प्रतिनिधींकडून समाधान -
दिलेला शब्द तातडीने पाळून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोये विकास सोसायटीच्या प्रतिनिधी जयश्री रमेशशेठ राळे, कुरकुंडीचे सरपंच तथा सोसायटी प्रतिनिधी नितीन भोकसे आणि पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे प्रतिनिधी मछिंद्र भुजबळ यांनी सुनीता बुट्टे पाटील व शरद बुट्टे पाटील यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या तिन्ही गावांतील सभामंडपांच्या उर्वरित कामांसाठी प्राधान्याने आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिले.