पणन मंत्र्यांकडे मांडल्या खेड बाजार समितीच्या सभापतींनी समस्या
राजगुरुनगर (पुणे) : राज्यात कांदा उत्पादित क्षेत्रात शंभर सुसज्ज कांदाचाळी उभारण्याची पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बाजार समितीच्या सभापतीसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत घोषणा आज (दि.१६) केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, साठवलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा आणि निर्यातीवरील निर्बंध शिथिल व्हावेत, यासाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी थेट पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी आज (दि.१६) ऑनलाईन बैठकीत मुद्दे मांडले.
सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवून ठेवत आहेत. परंतु निर्यातीवरील बंदीमुळे बांगलादेश, कोलंबो (श्रीलंका) आदी बाजारपेठेत कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून साठवलेला कांदा खराब होण्याची भीती आहे. दसरा-दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सभापती शिंदे यांनी निर्यातीवरील बंदी उठवावी, तसेच शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी केली.
या सर्व मागण्यांवर प्रतिसाद देताना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात शंभर सुसज्ज कांदाचाळी उभारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा खराब होऊ नये, यासाठी शासन स्तरावर प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल.बाजार समित्यांनी कांद्याचे ग्रेडिंग व ब्रँडिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मराठी कांद्याला स्पर्धात्मक स्थान मिळेल. शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचा प्रयत्न करावा,असेही आवाहन रावल यांनी केले.
या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निर्यातीवरील बंदी हटवल्यास बाजारभावात स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा वेळेवर विक्रीला येऊन नुकसान टळेल.कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन पातळीवर सुरू असलेला हा प्रयत्न सणासुदीच्या काळात निश्चितच दिलासा देणारा ठरणार आहे.