अपघातातील जखमीला उपचाराऐवजी गाडीतच तडफडून मारलं

मृतदेह रस्त्यावर फेकून पळणाऱ्या नराधम चालकाला ४८ तासांत बेड्या

 0
अपघातातील जखमीला उपचाराऐवजी गाडीतच तडफडून मारलं

चाकण (पुणे) : उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाला गाडीने जोरदार धडक दिल्यानंतर, त्याला रुग्णालयात नेण्याचा बहाणा करून गाडीत टाकले,मात्र वेळेत उपचार न देता त्याला गाडीतच तडफडून मरू दिले. एवढ्यावरच न थांबता,पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याचा मृतदेह दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर फेकून फरार झालेल्या पाषाणहृदयी बोलेरो चालकाला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत!

​या क्रूर कृत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध 'दोषी मनुष्यवधाचा' अत्यंत कडक गुन्हा दाखल केला आहे.

​आरोपी आणि मृत व्यक्तीची माहिती -

​अटक केलेला नराधम चालक: - मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४० वर्षे, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर).

​बळी ठरलेला निष्पाप तरुण: - मनोज कुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५ वर्षे).

​थरार... अपघात ते मृतदेहाची विल्हेवाट! -

​४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवरील खालुंब्रे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

​भीषण धडक आणि बनाव - 

मनोज कुमार विश्वकर्मा हे रस्ता ओलांडत असताना आरोपीच्या भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. मनोज रक्तबंबाळ अवस्थेत पडले असताना, चालक मेहबूब शेख खाली उतरला. त्याने उपचाराचा बहाणा करत मनोज यांना स्वतःच्या वाहनात टाकले.

​उपचाराविना गाडीतच मृत्यू -

आरोपीने जखमी मनोज यांना कोणत्याही रुग्णालयात नेले नाही. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने मनोज यांचा गाडीतच वेदनेने तडफडून मृत्यू झाला.

​मृतदेह रस्त्यावर फेकला -

मनोज यांचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांचा मृतदेह थेट शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जन रस्त्यावर फेकून दिला आणि तिथून पळ काढला.

पोलिसांचा 'थर्ड आय' आणि थरारक तपास -

​उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

​पोलिसांनी घटनास्थळापासून ते शिक्रापूरपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज खंगाळले.

​त्या तपासात अपघातातील वाहन हे महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक: MH-12 ZE-0779) असल्याचे स्पष्ट झाले.

​तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या आत आरोपी चालक मेहबूब शेख याला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.

हत्या की अपघात? पोलिसांनी लावले 'हे' कडक कलम! -

​आरोपी चालकाच्या या अत्यंत बेजबाबदार आणि क्रूर कृत्यामुळे जखमी व्यक्तीचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने मनोज यांना उपचाराअभावी मरू दिले. हा केवळ अपघात नसून एक प्रकारे क्रूर कृत्य आहे, हे ओळखून पोलिसांनी या गुन्ह्यात ​भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०५ (दोषी मनुष्यवध - Culpable Homicide not amounting to murder) ची वाढ केली आहे. या कलमांतर्गत आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे.

​वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.