खेडमध्ये जलसंपदा विभागाचा दशक्रिया विधी

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात खरपुडीत ग्रामस्थ करणार पिंडदान

 0
खेडमध्ये जलसंपदा विभागाचा दशक्रिया विधी

 खेड | प्रशासनाच्या सुस्त कारभाराला आणि बेजबाबदारपणाला कंटाळून अखेर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. खेड तालुक्यातील खरपुडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या (K.T.) बंधाऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या जलसंपदा विभागाचा चक्क 'दशक्रिया विधी' घालून, पिंडदान करत आणि डोक्यावरील केस काढून (टक्कल करून) सुतक पाळण्याचे अनोखे व अत्यंत आक्रमक आंदोलन ग्रामस्थांनी पुकारले आहे. प्रशासनाच्या या 'जिवंतपणीच्या मढ्यावर' होणार्या आंदोलनाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

* ​नेमका उद्रेक कशामुळे?

​चालू पावसाळ्यात जलसंपदा विभागाच्या निर्लज्ज दुर्लक्षामुळे खरपुडी खुर्द आणि खरपुडी बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या फळ्या (ढापे) वेळेवर काढल्या गेल्या नाहीत. परिणामी, बंधाऱ्याला भीषण धोका निर्माण झाला, लोखंडी खांब आणि ग्रिल उद्ध्वस्त झाले.

​या बेजबाबदारपणाचा सर्वात मोठा फटका पाठीमागील गरीब शेतकऱ्यांना बसला. पुराच्या पाण्याने पिके वाहून गेली, सुपीक शेतजमीन खरडून गेली आणि शेतकऱ्यांच्या हाती फक्त राख उरली! वर्षभराच्या रोजीरोटीचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हतबल शेतकऱ्याने यापूर्वी आपली जनावरे थेट जलसंपदा विभागाच्या कार्यालयात नेऊन बांधली होती, तर चाऱ्याअभावी काही जनावरे कवडीमोलाने विकावी लागली. एवढे होऊनही ढिम्म प्रशासन जागे झाले नाही; म्हणून आता ५ गावांतील शेतकरी प्रशासनाचा 'दशक्रिया' घालणार आहेत.

*​रब्बी हंगाम धोक्यात; त्वरित दुरुस्तीची गरज!

​बंधाऱ्याची दुरावस्था कायम राहिल्यास खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मांजरेवाडी पिंपळ, मांजरेवाडी धर्म आणि मलघेवाडी या पाचही गावांतील रब्बी हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी बंधाऱ्याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास शेतकरी भुकेने मरतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

* ​असे असेल आक्रमक आंदोलन!

​दिवस व वेळ: मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोबर | सकाळी ८.०० वाजता

* ​ठिकाण: कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, खरपुडी

​स्वरुप: जलसंपदा विभागाचा दशक्रिया विधी, पिंडदान आणि टक्कल आंदोलन.

​या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ टोपे, संभाजी गाडे, प्रणित गाडे, सचिन गाडे, शुभम गाडे, योगेश काशीद, अशोक मांजरे, राजेंद्र मांजरे, शिवाजी गाडे, सतीश तनपुरे, किरण काशीद, देवा खंडागळे, सुभाष गाडे तसेच बाजार समितीचे माजी उपसभापती दशरथ गाडे यांच्यासह शेकडो शेतकरी व ग्रामस्थ आक्रमकपणे सहभागी होणार आहेत.

* ​शेतकऱ्यांचे प्रशासनाला थेट सवाल आणि मागण्या:

​तात्काळ दुरुस्ती: पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून पाणी अडवण्यासाठी तात्काळ व्यवस्था करावी.

* ​बांधकाम पूर्ववत करा: पुरामुळे वाहून गेलेला भराव, दगडी बांधकाम, संरक्षक पोल आणि ढापे पुन्हा बसवावेत.

* ​भरपाई द्या: अतिवृष्टी आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून रोख भरपाई द्या.

* ​अधिकाऱ्यांवर कारवाई करा: वेळेत ढापे न काढल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा!

* ​काटेकोर वेळापत्रक: पुढील वर्षापासून बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याबाबत आणि बसवण्याबाबत वेळापत्रकाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.

​"आता आश्वासनं नकोत, कृती हवी! बंधारा दुरुस्त करा, नाहीतर जलसंपदा विभागाचे श्राद्ध घालायला आम्ही सज्ज आहोत!"

— संतप्त ग्रामस्थ व शेतकरी, खेड तालुका.