राजगुरूनगर बँक सर्वसामान्य माणसाला आर्थिक आधार देणारी बँक - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
राजगुरुनगर ( पुणे ) : गावागावात सहकार क्षेत्र सशक्त, मजबूत आणि बळकट केले जात असून त्या माध्यमातून गावातील नागरिकांना आर्थिक साक्षर केले जात आहे. राजगुरुनगर सहकारी बँक सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक ठरली आहे.असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वासुली फाटा (ता.खेड ) १८ व्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ बोलत होते.याप्रसंगी याप्रसंगी आमदार बाबाजी काळे,बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल,उपाध्यक्ष अविनाश कहाणे,भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील,संचालक किरण आहेर,संचालक / पत्रकार राजेंद्र सांडभोर,अश्विनी पाचारणे,विजया शिंदे,राजेंद्र वाळुंज,राहुल तांबे,रामदास धनवटे,विनायक घुमटकर,सागर पाटोळे,क्रांती सोमवंशी,प्रिया पवार,दत्तात्रय भेगडे,महेश शेवकरी,संजय घुंडरे,सरपंच कोमल पाचपुते आदींसह सभासद, ठेवीदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की,आपला देश हा शेती प्रधान देश आहे. देशातील जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि ती शेती व्यवसाय करते. देशात सहकार क्षेत्र समृद्ध बनले आहे. त्याचा कारभार स्वतंत्र्यपणे करण्यासाठी सहकार मंत्रालय देशात सुरु झाले आहे. सहकार चळवळ समृद्ध आणि सशक्त बनविण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. केंद्रीय पातळीवर त्यास चालना मिळत आहे. गावागावात सहकार क्षेत्र सशक्त, मजबूत आणि बळकट केले जात असून त्या माध्यमातून गावातील नागरिकांना आर्थिक साक्षर केले जात आहे. राजगुरुनगर सहकारी बँक सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक ठरली आहे. आरबीआयचे निकष पूर्ण करून राजगुरुनगर सहकारी बँकेने प्रगती साधली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल केली आहे हि अभिमानस्पद बाब आहे.असे गौरवोद्गार मंत्री मोहोळ यांनी काढले.
बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल म्हणाले, बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल म्हणाले, परंपरेवर आणि उत्तम कारभाराच्या जोरावर बँक आजही सहकार क्षेत्रात पहिल्या स्थानावर आहे. खाजगी बँकांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञान उभे केले आहे.बँकेने पुढील ५० वर्षे टिकेल असा तांत्रिक, भौतिक आणि आर्थिक पाया मजबूत केला आहे. बँकेने आज पासून "तुकोबा आवर्त ठेव योजना" सुरु केली आहे. सन २०२३ -२४ वर्षाचा ९ टक्के दराने लाभांश सभासद खातेदारांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. रिजर्व बँकेची नागरी सहकारी बँकांना अनेक बंधने आहेत त्यातली काही बँकेच्या हिताची आहेत काही अटीचा बँकांना फार त्रास होत आहे. व्यावसायिक, खाजगी सहकारी बँकांमध्ये भेदभाव होऊ नये. आमचे पाय बांधून त्यांच्याशी स्पर्धा कार्ययला सांगितली तर ती आम्ही कशी करणार ? असा सवालही ओसवाल यांनी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करीत काही अटी शिथिल करण्याची मागणी केली.
आमदार बाबाजी काळे म्हणाले, तालुक्यातील भामचंद्र डोंगर परिसराचा विकास करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकाराच्या माध्यमातून या परिसराच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पाठपुरावा करू, त्यांच्या माध्यमातून वासुली- भांबोली गावाच्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करू राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आणि आर्थिक प्रगतीबाबत आमदार काळे यांनी प्रशंसा केली.
* अर्बन कॉपरेटिव बँकांच्या सगळ्या बँकांना आधार देण्यासाठी म्हणून एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन सुरू केलेअसून त्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून देशातील जवळ जवळ या सगळ्या बँकांना हवी ती मदत केली जाते. देशातील या सर्व बँकांना ताकद देण्यासाठी म्हणून देशातील सहकार मंत्रालय, भारत सरकारने अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अधिक मोठी शिखर संघटना उभी केली. त्याच्यातून पुढच्या काळात निश्चितपणे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये उन्नती मध्ये पुढे असेल.
* केंद्र आणि राज्य सरकार हे इंजिनचे सरकार आहे त्यांच्यामाध्यमातून सहकार क्षेत्रातील समस्या प्रश्न सोडवले जात केले जात आहेत. बँकेच्या विकासाच्या कामांमध्ये कुठल्याही राजकारण किंवा वैचारिक विचार मतभेद येणार नाही अशी सर्व संचालकांची भूमिका असली पाहिजे.असेही केंद्रीय राज्य मंत्री मोहोळ यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन योगिता पाचारणे,बाळासाहेब घाटे यांनी केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी मानले.