कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजार सुविधात्मक करणार - नुतन सभापती अशोकदादा राक्षे
चाकणमध्ये आडते असोसिएशनकडून नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींचा सत्कार
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण उपबाजार सर्व सुविधात्मक करणार असून,शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसह, व्यापारी,आडतदार आणि हमाल मापाडी यांना दिलासा देणाऱ्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुतून सभापतीपदी अशोकदादा राक्षे यांनी चाकण येथे सत्कार समारंभ प्रसंगी केली.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोकदादा राक्षे आणि उपसभापतीपदी युवक नेते रणजित गाडे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर चाकण आडते असोसिएशनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी राक्षे यांनी वरील घोषणा केली.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे, माणिक गोरे,आडते असोसिएशनचे अध्यक्ष संजय वहिले, बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे, रविंद्र बोराटे,संभाजी कलवडे,हमाल-मापाडी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, कुमार गोरे,भानुदास टेंगले,भानुदास बुट्टेपाटील,दशरथ काचोळे,अनिल देशमुख, जगदीश मेदनकर,संतोष खैरे,संभाजी कलवडे, चाकण सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय गोरे,जीवन टोपे,दादाभाऊ हुंडारे,माऊली शेवकरी,अशोक जाधव आदींसह आडतदार, हमाल आणि मापडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सभापती अशोकदादा राक्षे म्हणाले, "सर्व संचालकांच्या सहकार्यामुळे बाजार समितीने विकासाची नवी उंची गाठली आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करू.शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविणे, नियमित संवाद ठेवणे आणि बाजार समितीची सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
यावेळी मनोगत व्यक्त करताना उपसभापती रणजित गाडे पाटील म्हणाले,आडते हे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील विश्वासाचा दुवा आहेत. बाजार समितीची चांगली परंपरा आणि पारदर्शक कारभार सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने अधिक सक्षमपणे पुढे नेण्यात येईल.
यावेळी चाकण सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय गोरे यांचाही आडते असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी सरपंच दशरथ काचोळे यांनी केले.