कुरकुंडी फाट्यावरील अपघातानंतर अखेर स्पीड ब्रेकर बसवले;धोकादायक झाडे हटवली

जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने उपाययोजना

 0
कुरकुंडी फाट्यावरील अपघातानंतर अखेर स्पीड ब्रेकर बसवले;धोकादायक झाडे हटवली

खेड (पुणे) | हसत्या-खेळत्या वयात एका निष्पाप लेकीचा दुर्दैवी अंत झाल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार खेड तालुक्यातील शिरोली फाटा ते पाईट मार्गावर समोर आला आहे. कुरकुंडी फाटा येथे रस्त्यावर आलेल्या धोकादायक झाडांमुळे झालेल्या भीषण अपघातात कु. आदिती नवनाथ राळे हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेल्या अन्य चार मुली गंभीर जखमी झाल्या. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​रस्त्यावर आलेली धोकादायक झाडे वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत होती. याच झाडांमुळे आदितीचा निष्पाप जीव गेला आणि तिच्या मैत्रिणी जखमी झाल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने राळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

* ​गणेश बोत्रे आणि ग्रामस्थांची तातडीने धाव -

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद सदस्य गणेश कांताराम बोत्रे यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. भविष्यात पुन्हा असा अपघात घडू नये आणि कोणत्याही निष्पाप जीवाचा बळी जाऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या. गणेश बोत्रे यांच्या पुढाकाराने तसेच गावातील सर्व तरुण सहकारी, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सक्रिय सहकार्यातून हे काम तातडीने मार्गी लावण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्यात आली, तसेच वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी घटनास्थळी तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात आले.

* ​प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमधून संताप -

अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने रस्त्यांची नियमित पाहणी करून धोकादायक झाडे, गतिरोधक आणि सूचना फलकांची व्यवस्था वेळेत करावी, जेणेकरून कोणत्याही कुटुंबाचा असा आधार हिरावला जाणार नाही, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चिमुरड्या आदितीच्या अकाली जाण्याने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत असून, जखमी मुली लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांकडून प्रार्थना केली जात आहे. दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून गणेश बोत्रे आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेचे समाधान व्यक्त होत असले, तरी "एका निष्पाप लेकीचा जीव जाण्यापूर्वीच प्रशासनाला ही जाग का आली नाही?" हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहे.