सोमवंशींचे सहकार क्षेत्रातील वजन पुन्हा सिद्ध; शेंदुर्ली सोसायटीकडून जिल्हा बँकेसाठी बिनविरोध प्रतिनिधित्व
खेड | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) सन २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सहकार क्षेत्रात अरुण बाजीराव सोमवंशी यांचे राजकीय व सहकारी क्षेत्रातील वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शेंदुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. यांच्यावतीने मतदार प्रतिनिधी म्हणून अरुण सोमवंशी यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.
शेंदुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी ठराव क्रमांक १ अन्वये हा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी तसेच निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक अधिकार देण्याचा प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
विरोधाला फाटा; सोमवंशींच्या नावावर एकमत
सोमवंशी यांच्या नावाला संस्थेतील कोणत्याही संचालक किंवा सभासदाने विरोध न करता त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोमवंशी हेच असावेत’, अशी भूमिका संचालक मंडळातून मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेंदुर्ली परिसरातील सहकार क्षेत्रात या निवडीची चर्चा सुरू झाली आहे.
अरुण सोमवंशी हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. राजकीय परिस्थितीत विविध चढ-उतार आले, अनेकांनी राजकीय भूमिका बदलल्या; मात्र सोमवंशी यांनी मोहिते पाटील यांची साथ कायम ठेवली. त्यांच्या या निष्ठेची आणि सातत्याचीच पावती या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून मिळाल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे.
सर्वपक्षीय सलोखा ठरतोय जमेची बाजू
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार, भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी खराबवाडीचे माजी संचालक तसेच खेड खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक म्हणून सोमवंशी यांनी तालुक्यातील सहकार क्षेत्रात काम केले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांनी सहकार क्षेत्रातील आपले स्थान मजबूत केल्याचे बोलले जाते.
राजकीय मतभेदांपेक्षा सहकार क्षेत्रातील कामकाजाला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आणि सर्वपक्षीयांशी असलेले संबंध यामुळेच शेंदुर्ली सोसायटीच्या निवडीत त्यांच्याविरोधात कोणताही उमेदवार उभा राहिला नसल्याचे चित्र आहे.
“राजकारणातील चढ-उतारांपेक्षा सातत्य, संयम आणि निष्ठेला अधिक महत्त्व असते. शेंदुर्ली सोसायटीच्या बिनविरोध ठरावातून हेच पुन्हा अधोरेखित झाले,” अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अरुण सोमवंशी यांची PDCC बँकेच्या मतदार प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खेड तालुक्यातील सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.