राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी; खेड तालुकाध्यक्षपदी अंकुश राक्षे
खेड ( पुणे ) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या खेड तालुकाध्यक्षपदी माजी पंचायत समिती सभापती अंकुश सुदाम राक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीला गती देण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते राक्षे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
खेड तालुक्यात अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या राजकीय धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर अंकुश राक्षे यांच्याकडे पक्ष संघटना मजबूत करणे, नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणणे आणि आगामी काळातील निवडणुकांसाठी सक्षम यंत्रणा उभी करणे,अशी मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या राक्षे यांच्या नियुक्तीमुळे मोहिते समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्तीप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेपाटील, माजी नगरसेवक शंकर राक्षे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* अभ्यासू नेतृत्वाला संघटनात्मक संधी
युवा नेतृत्व, संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे अंकुश राक्षे यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून स्वतंत्र छाप पाडली आहे. कोरोनाकाळातील सामाजिक कार्यामुळेही त्यांनी जनसंपर्क मजबूत केला होता. त्यामुळे पक्षाच्या नव्या संघटनात्मक रणनीतीत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे मानले जात आहे.
* यांच्या वाढत्या प्रभावाला राजकीय उत्तर?
खेड तालुक्यात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांचा वाढता प्रभाव आणि राष्ट्रवादीला बसलेले सलग राजकीय धक्के हा सध्या चर्चेचा विषय आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राक्षे कुटुंबाला झालेला पराभव, कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय घडामोडी तसेच विविध सहकारी संस्थांमधील सत्तांतरामुळे राष्ट्रवादीची पकड कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर अंकुश राक्षे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती ही केवळ संघटनात्मक बदल नसून आगामी राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून आखलेली रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.आगामी काळात पार्श्वभूमीवर राक्षे हे राष्ट्रवादीची गळती रोखण्यात, संघटना पुन्हा उभी करण्यात आणि विरोधकांना राजकीय आव्हान देण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे आता खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.