क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींसाठी सायकल / शिष्यवृत्ती वाटप

 0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींसाठी सायकल / शिष्यवृत्ती वाटप
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींसाठी सायकल / शिष्यवृत्ती वाटप

सह्याद्री DIGITAL NEWS | स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाकळवाडी (ता.खेड) येथे मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.वाटर्स फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने वाकळवाडी, जऊळके व चिंचबाईवाडी परिसरातील विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

जिल्हा परिषद शाळा, वाकळवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात ग्रामीण भागातील १५ मुलींना शाळेत ये-जा सुलभ व्हावी यासाठी मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी १० गुणवंत मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वाकळवाडीचे विद्यमान सरपंच कु.नरेंद्र संभाजी वाळुंज होते.

 “ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. शिक्षणामुळेच मुली सक्षम, आत्मनिर्भर बनतात आणि समाजाच्या प्रगतीला दिशा मिळते.” वाटर्स फाऊंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण विद्यार्थिनींना नवी उमेद मिळत असल्याचे सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी नमूद केले.

वाटर्स फाऊंडेशनचे रिजनल मॅनेजर संतोष चौधरी यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत, शिक्षण, आरोग्य व महिलासक्षमीकरण या क्षेत्रात संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. प्रोजेक्ट मॅनेजर स्वप्निल आंत्रे यांनी मुलींच्या शिक्षणासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास गोसासी गावाचे सरपंच संतोष गोरडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य रुपाली पवळे,योगेश पवळे, खुशाल पवळे,अशोक पवळे,नारायण पुरी तसेच जिल्हा परिषद शाळा वाकळवाडीचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांना पुढे नेणारा हा उपक्रम असल्याचे सांगत, वाटर्स फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील मुलींमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास निर्माण करणारा व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.