चाकण औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या थकीत करांचा आढावा;अनधिकृत उद्योगांवर कारवाईचे बडगा
चाकण (पुणे) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या कारखान्यांच्या थकीत कर व नोंद नसलेल्या उद्योगांबाबत पुणे जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य गणेश कांताराम बोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चाकण एमआयडीसीचे संबंधित अधिकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी थकीत कर वसुली,नोंद नसलेले व अनधिकृत कारखाने, तसेच ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या महसुलाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, अद्याप नोंद न झालेल्या कारखान्यांची तातडीने नोंदणी करण्यात यावी. तसेच थकीत कराची रक्कम लवकरात लवकर वसूल करावी, अन्यथा संबंधित कारखान्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
जिल्हा परिषद सदस्य गणेश कांताराम बोत्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच ही प्रक्रिया गतीमान झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे ग्रामपंचायतींच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर वसूल होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
दरम्यान, या बैठकीमुळे संबंधित ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळून स्थानिक विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.