चाकण परिसरात दादागिरी कराल तर पाताळातून शोधून काढू;गुन्हेगारांनो सरळ व्हा नाही तर गाशा गुंडाळा

डंपर चालकाच्या डोक्यात लोखंडी टॉमीने हल्ला; दोन सराईतांच्या आवळल्या मुसक्या

 0
चाकण परिसरात दादागिरी कराल तर पाताळातून शोधून काढू;गुन्हेगारांनो सरळ व्हा नाही तर गाशा गुंडाळा

क्राईम | हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून डंपर चालकाच्या डोक्यात लोखंडी टॉमीने प्रहार करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींच्या चाकण दक्षिण पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुसक्या आवळल्या.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे तपास करत पोलिसांनी एकाला कर्नाटकातील बिदर, तर दुसऱ्याला लातूर येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे चाकण परिसरात दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

चाकण जवळील नाणेकरवाडी येथील स्क्रॅप गोदामाजवळ (दि १३ ) सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. डंपर चालक महादेव शंकर सोळंके (वय ३६) हे वाहन घेऊन जात असताना त्यांनी हॉर्न वाजविल्याचा राग मनात धरून हरिदास रामकिशन कलबोले आणि लखन तातेराव आवले यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली.

मारहाणीदरम्यान आरोपींनी लोखंडी टॉमीने सोळंके यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १२६(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनने आरोपींचा माग काढला

घटनेनंतर आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. आरोपी कर्नाटकच्या दिशेने पसार झाल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर रवाना झाले.

पोलिसांनी पाठलाग करत हरिदास कलबोले याला कर्नाटकातील बिदर येथून, तर लखन आवले याला लातूर येथून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली आणि सहायक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोते, तसेच पोलीस अंमलदार शिवाजी चव्हाण, सुनील भागवत, रेवन्नाथ खेडकर, राहुल मिसाळ, गजानन चव्हाण, आदम शेख, प्रियंका गिरी आणि विशाल बंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हा करून पसार झाल्यानंतरही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत, हे या कारवाईतून चाकण पोलिसांनी दाखवून दिले आहे.