खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी श्यामराव बारणे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
सह्याद्री DIGITAL NEWS | खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी श्यामराव बारणे यांची सेवा पूर्ण झाल्यानिमित्त चाकण येथील महात्मा जोतीराव फुले उपबाजार आवारात भावपूर्ण सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीतील दीर्घकालीन आणि निष्ठावंत सेवेबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
या वेळी महात्मा जोतीराव फुले उपबाजारातील तरकारी आडते असोसिएशनचे अध्यक्ष संजय वहिले, लाला बँकेचे संचालक तथा आडतदार भानुदास टेंगले,माजी संचालक राम गोरे,लहू कोळेकर,चंद्रकांत दौडकर,दशरथ काचोळे,संतोष खैरे,कुमार गोरे,चांगदेव बोराटे,सहसचिव संतोष गायकवाड, यांच्यासह आडतदार, व्यापारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्यामराव बारणे यांनी आपल्या सेवाकाळात बाजार समितीच्या कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य दिले. कांदा, बटाटा, तरकारी तसेच पालेभाज्यांच्या बाजारातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दररोजच्या लिलाव प्रक्रियेत शेतकरी, आडतदार आणि व्यापारी यांच्यात समन्वय राखून व्यवहार सुरळीत चालावेत, यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शेतकऱ्यांना योग्य दर मिळावेत, व्यापाऱ्यांच्या अडचणी वेळेत सोडवल्या जाव्यात तसेच बाजारातील व्यवस्था अधिक सुकर व्हावी, यासाठी बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे बाजारातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांनी श्यामराव बारणे यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात बारणे यांनी सहकारी कर्मचारी, आडतदार आणि शेतकरी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप सन्मानपत्र व सत्काराने करण्यात आला.