हाऊसकिपिंगच्या थकीत बिलावरून वाद; वकिलाला पाच जणांकडून बेदम मारहाण

सरपंच पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

 0
हाऊसकिपिंगच्या थकीत बिलावरून वाद; वकिलाला पाच जणांकडून बेदम मारहाण

क्राईम | सोसायटी हाऊसकिपिंगच्या थकीत बिलाच्या हिशेबावरून झालेल्या वादातून एका वकिलाला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. ६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निघोजे येथे घडली. याप्रकरणी निघोजे गावच्या सरपंच पतीसह एकूण पाच जणांविरुद्ध दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ॲड. बभिषण रामदास पडवळ (वय ३५, रा. कॅपिटल सिटी सोसायटी, निघोजे) यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास हिरामण येळवंडे (वय ४२), शुभम विजय येळवंडे (वय २५), तुषार तानाजी येळवंडे (वय ३८) आणि दोन महिलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​वार्षिक सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथील 'कॅपिटल सिटी' सोसायटीच्या क्लब हाऊससमोरील मोकळ्या जागेत वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होती. प्रश्नोत्तराच्या तासात फिर्यादी ॲड. पडवळ आणि इतर सदस्यांनी सोसायटीच्या हाऊसकिपिंगच्या थकीत बिलांबाबत विचारणा करत तपशील मागितला. यावरून सभेच्या अध्यक्षांनी फिर्यादीसह सदस्यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केल्याने वाद पेटला.अध्यक्षांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात वाद घातला. त्यानंतर अन्य आरोपींनी ॲड. पडवळ यांना लाथाबुक्क्यांनी डोके, पाठ, छाती, तोंड आणि पायांवर बेदम मारहाण केली.

​पत्नीशी गैरवर्तन व जीवे मारण्याची धमकी

यावेळी उपस्थित दोन महिला आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी पुढे आली असता, आरोपींनी त्यांच्याशीही अश्लील व लज्जास्पद भाषेत बोलून त्यांचा अपमान केला, असे तक्रारीत नमूद आहे.

​याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ७९, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.