आषाढी एकादशीनिमित्त चाकण उपबाजार आवारात खिचडी वाटप

शेतकरी,हमाल,मापाडी व व्यापाऱ्यांनी घेतला प्रसादाचा लाभ

 0
आषाढी एकादशीनिमित्त चाकण उपबाजार आवारात खिचडी वाटप

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिराव फुले उपबाजार आवार, चाकण येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात खिचडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संचालक महेंद्र गोरे यांच्या हस्ते आवारातील संदीप शेंडे व सर्व मापाडी बंधूंच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि बाजार आवारातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष संजय वहिले, आडतदार संतोष खैरे, लहू कोळेकर यांच्यासह बाजार आवारातील अनेक आडतदार, व्यापारी, मापाडी बंधू, हमाल, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. बाजार आवारात सकाळपासूनच भाविकांची व नागरिकांची गर्दी होती. उपस्थितांना प्रेमाने खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. या उपक्रमामुळे बाजार आवारात सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचे दर्शन घडले.

उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव वाढण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप शेंडे, सर्व मापाडी बंधू तसेच बाजार आवारातील सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या खिचडी वाटप उपक्रमामुळे संपूर्ण उपबाजार आवार भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.