येलवाडी परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत; ३० ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

दिवसाला आठ ते दहा तास वीज गायब; विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त

 0
येलवाडी परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत; ३० ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

खेड (पुणे) | तीर्थक्षेत्र येलवाडी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या एक ते दोन वर्षांपासून वीजपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्णालये, मेडिकल व्यावसायिक, कामगार, लहान-मोठे व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल होत असल्याचा आरोप तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने केला आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

येलवाडी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये अनेकदा दिवसाला आठ ते दहा तास वीजपुरवठा खंडित होतो. काही वेळा गावातील एखाद्या भागात सलग चार ते पाच दिवस वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यातच विजेचा दाब वारंवार कमी-जास्त होत असल्याने घरातील अनेक विद्युत उपकरणे जळाली आहेत. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीही जळाल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, दवाखाने आणि औषध विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोडशेडिंगची वेळ निश्चित करण्याची मागणी

वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. लोडशेडिंगचा दिवस आणि वेळ निश्चित करण्यात यावी, तसेच लोडशेडिंगची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० अशी ठेवावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे. सध्या सुमारे १४ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा समितीने केला आहे. महावितरणने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन वीजपुरवठा नियमित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन

येलवाडी आणि पंचक्रोशीतील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता देहूफाटा ते देहूगाव मार्गावरील येलवाडी गावच्या कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने दिला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.