आंबेगावच्या शिरदाळेत १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण
वृक्षवल्ली संस्थेला वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी परदेशातून आर्थिक मदत
आंबेगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवार,वृक्षवल्ली संस्थेच्या वतीने शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे वृक्षारोपण व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ७० देशी वृक्षांची लागवड, ३० औषधी रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षवल्ली संस्थेच्या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत विविध देणगीदारांकडून एकूण ६४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वड,पिंपळ, जांभूळ, करंज, कांचन, नारळ व उंबर या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने अडुळसा, इन्सुलिन आणि कढीपत्ता या औषधी वनस्पतींची ३० रोपे ग्रामस्थ व मान्यवरांना भेट देण्यात आली.
यानंतर गावातील मंदिरात झालेल्या सन्मान सोहळ्यात शिरदाळे गावाचे कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा प्रकटस्थान, सागदरा येथील जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा औषधी रोपे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.
शिरदाळे गावाचे सुपुत्र व सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेले एआय विषयातील पीएचडी धारक डॉ. संकेत सुभाष काचोळे यांनी संस्थेच्या कार्यासाठी ५० हजारांची आर्थिक मदत दिली. उद्योजक व कंत्राटदार मनोज बारकू तांबे यांनी १० हजारांचा धनादेश संस्थेला सुपूर्द केला. तसेच कै. रामदास तुळशीराम तांबे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी ४ हजार ५०० रुपयांची देणगी दिली. त्यामुळे संस्थेला एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला.
या निधीच्या माध्यमातून भविष्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच गावहिताचे विविध सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमास शिवऋण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय बोराडे, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजीशेठ चासकर, यादवशेठ चासकर, दैनिक सामनाचे उपसंपादक विठ्ठलराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अंकुश भूमकर, धामणीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवारातील सुमारे ४० सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संदीप सुरेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृक्षवल्ली संस्थेचे संस्थापक सुशांत राजू तांबे यांनी केले.
"झाडे लावूया, झाडे जगवूया, निसर्ग वाचवूया, समाज घडवूया" हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.