निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा दीपस्तंभ हरपला...
कै.मारुतराव तुकाराम बारणे (आप्पा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे जिल्ह्यातील दोंदे (ता. खेड) गावाचे ज्येष्ठ, जाणते, दूरदृष्टीचे आणि निःस्वार्थी समाजनेते कै. मारुतराव तुकाराम बारणे (आप्पा) यांचे गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने दोंदे परिसरासह खेड तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी सहकार, शिक्षण, ग्रामविकास, कृषी आणि समाजकारणात अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करून आदर्श सार्वजनिक जीवन जगले.
"कुटुंब सांभाळून समाजकारण आणि निष्ठा ठेवून राजकारण" हे त्यांचे जीवनसूत्र होते. पद, सत्ता किंवा प्रसिद्धी यांचा मोह न बाळगता त्यांनी प्रत्येक जबाबदारी समाजसेवेचे माध्यम म्हणून स्वीकारली. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा ठसा अनेक पिढ्यांच्या मनावर उमटला.
* ग्रामविकासासाठी आयुष्य समर्पित -
आप्पांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात दोंदे गावापासून केली. दोंदे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सलग ३५ वर्षे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. या कालावधीत सरपंच आणि उपसरपंच म्हणूनही त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गावातील पायाभूत सुविधा, विकासकामे आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
* सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व -
सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य तितकेच उल्लेखनीय राहिले. दोंदे विविध सहकारी सेवा सोसायटीचे दोन वेळा चेअरमन, तीन वेळा व्हाइस चेअरमन आणि सलग ३३ वर्षे संचालक म्हणून त्यांनी शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी काम केले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग २० वर्षे संचालक, दोन वेळा सभापती आणि दोन वेळा उपसभापती म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. तसेच खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे दोन वेळा अध्यक्ष आणि संचालक म्हणूनही त्यांनी सहकार चळवळीला बळ दिले.
* शिक्षण क्षेत्राचा भक्कम पाया -
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ही त्यांची कायमची धडपड होती. दोंदे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या भैरवनाथ विद्यालयाचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक म्हणून सुमारे १५ वर्षे त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय
आळंदी येथील दोंदेकर धर्मशाळेचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी धर्मशाळेच्या नूतनीकरणात सक्रिय सहभाग घेतला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, सामाजिक ऐक्य टिकविणे आणि सार्वजनिक संस्थांना सक्षम करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. संस्था ही समाजहितासाठी कार्यरत राहावी, याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे.
* निष्ठेच्या राजकारणाचा आदर्श -
राजकारणातही त्यांनी मूल्याधिष्ठित भूमिका कायम जपली. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात ते विश्वासू सहकारी आणि निष्ठावान शिलेदार म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या या अखंड निष्ठेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना "निष्ठेचे शिलेदार" हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा हा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समाजसेवेचा सन्मान होता.
* कुटुंबीयांचा आधारवड -
कै. मारुतराव बारणे यांच्या पश्चात प्रगतशील शेतकरी सोपानराव बारणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रेय बारणे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त अधिकारी शामराव बारणे आणि सरला राक्षे यांचा परिवार आहे. तसेच राजगुरूनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशालीताई बारणे यांचे ते सासरे होत.
* प्रेरणादायी वारसा -
कै. मारुतराव तुकाराम बारणे (आप्पा) यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून समाजसेवा, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचा आदर्श निर्माण केला. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्यांची जीवनज्योत मालवली असली, तरी त्यांनी निर्माण केलेली मूल्ये, उभ्या केलेल्या संस्था आणि समाजासाठी केलेले कार्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
कै. मारुतराव तुकाराम बारणे (आप्पा) यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!