पुणे जिल्ह्यात शांततेत मतदान;दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शांततेत

 0
पुणे जिल्ह्यात शांततेत मतदान;दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शांततेत
पुणे जिल्ह्यात शांततेत मतदान;दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांचे मतदान शांततेत

सह्याद्री LIVE | दीर्घ कालावधीनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी (दि.६) पुणे जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास मतदानाचा वेग काहीसा मंदावला. सायंकाळी पुन्हा एकदा मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. लग्नसराईचा मुहूर्त जोरात असल्याचा परिणाम काही प्रमाणात मतदानावर झाल्याचे दिसून आले, मात्र अनेक वऱ्हाडी मंडळींनी सकाळीच मतदान करून नागरी कर्तव्य बजावले.

* बारामतीत निवडणुकीवर शोकाची छाया; मतदान केंद्रांवर उदासीनता -

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बारामती तालुक्यात मतदान प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या शांततेत पार पडली असली, तरी वातावरणात नेहमीचा उत्साह मात्र जाणवत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या शोकमय वातावरणाचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती अत्यल्प होती. प्रशासनाने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे मतदानाचा टक्का सुमारे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला. या निवडणुकीवर अजित पवार यांच्या निधनाची छाया स्पष्टपणे उमटली असून, ही निवडणूक बारामतीच्या राजकीय इतिहासात भावनिक आणि थंडावलेली म्हणून नोंदली जाण्याची शक्यता आहे.

* खेडमध्ये तणावपूर्ण पार्श्वभूमी, मात्र मतदान शांततेत -

खेड तालुक्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढवला.मतदार यादीतील गोंधळाने अनेक ठिकाणी मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

परिणामी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.आठ गटांतील २८ उमेदवार व १६ गणांमधील ६१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवारी मतमोजणी होणार आहे.

* जुन्नरमध्ये ६१ टक्क्यांहून अधिक मतदान; यंत्र बदलण्याची घटना -

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ६१.१५ टक्के मतदान झाले. किरकोळ घोषणाबाजीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. आळे येथील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रातून सतत बीप आवाज येत असल्याने पहिल्या तासातच यंत्र बदलण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक व पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

* आंबेगाव तालुक्यात सकाळीच मतदारांची गर्दी -

आंबेगाव तालुक्यात मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. खडकवाडी येथे लग्न असतानाही नवरदेव मतदान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

*दौंड तालुक्यात उत्साह, तक्रारी आणि सजावटीचे चित्र -

दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी ३४, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी अपक्ष व बंडखोर उमेदवारांनी निवडणूक रंगतदार केली. मलठण येथे मतदान प्रतिनिधीने आधीच बटण दाबल्याची तक्रार करण्यात आली. कानगाव येथे मतदान केंद्र वाढवल्यामुळे अनुक्रमांकाचा गोंधळ उडाल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

भोर तालुक्यात निवडणूक प्रतिष्ठेची -

भोर तालुक्यात पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी शांततेत मतदान झाले. ४९ उमेदवारांनी स्वतः मतदान केले. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने आमदार शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.