खेड तालुक्यातील पश्चिम भागाला विनामूल्य 'स्वर्गरथा'चा आधार
पानमंद कुटुंबाचा सामाजिक पुढाकार
खेड (पुणे) | आप्तजनांच्या निधनानंतर दुःखात बुडालेल्या कुटुंबाला अंत्यविधीच्या वेळी भेडसावणारी मोठी अडचण लक्षात घेऊन पानमंद कुटुंबाने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमातून परिसरातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कै. बबन रामजी पानमंद यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कांताराम बबन पानमंद आणि उद्योजक दशरथ बबन पानमंद यांच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘स्वर्गरथा’च्या सेवेचा आजपर्यंत तब्बल ३०० हून अधिक कुटुंबांनी लाभ घेतला आहे.
चाकण एमआयडीसी परिसरासह खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेह सन्मानपूर्वक अंत्यविधी स्थळापर्यंत नेण्यासाठी अनेकदा वाहनांची अनुपलब्धता किंवा मोठा खर्च करावा लागतो. ही अडचण ओळखून पानमंद कुटुंबाने वासुली फाटा परिसरापासून जवळपास २० किलोमीटरच्या त्रिज्येतील ग्रामीण व औद्योगीक भागातील नागरिकांसाठी विनामूल्य स्वर्गरथाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
* चालकासह इंधनाचा खर्चही पानमंद कुटुंबाकडून
या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या कुटुंबाला या स्वर्गरथाची आवश्यकता असेल, त्यांच्याकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही. वाहनाचा चालक आणि लागणारे डिझेल यांचा संपूर्ण खर्च स्वतः पानमंद कुटुंब करत आहे. दिवसा असो वा ऐन मध्यरात्री, केवळ एका निरोपावर ही रुग्णवाहिका/स्वर्गरथ सेवा तत्परतेने घटनास्थळी पोहोचवली जाते.
आसपासच्या पंचक्रोशीतील गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी कठीण प्रसंगी ही सेवा एक मोठा आधारवड ठरली असून, पानमंद कुटुंबाच्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकीचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.