आळंदीत चिखला प्रकरणी जाहीर निषेध;दोषींवर कारवाईची मागणी

 0
आळंदीत चिखला प्रकरणी जाहीर निषेध;दोषींवर कारवाईची मागणी

सामाजिक | चिखली (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीस विरोध झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत संतापाची लाट उसळली.आळंदी नागरिकांच्या वतीने आळंदी देवाची येथील शिवस्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

चिखला गावात स्मारक उभारणीदरम्यान काही समाजकंटकांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.यावेळी संजीवनी वाघ या महिलेसोबत झटापट झाल्याचेही सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील,ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, शिवसेना (उबाठा) गटाचे माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे पाटील,निसारभाई सय्यद, शिवसेना (उबाठा) आळंदी शहर उपप्रमुख शशी राजे जाधव,अरुण कुरे पाटील,बालाजी शिंदे पाटील,दत्ता शिंदे पाटील,ज्ञानेश्वर मोरे पाटील, बालासाहेब टेकाळे,माऊली टेकाळे पाटील,भागवत शेजुळ पाटील आदी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाला विरोध करणे ही अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह बाब आहे.” महिलेशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

* प्रमुख मागण्या -

स्मारक उभारणीस विरोध करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

चिखला गावात शिवस्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे.

राज्य शासनाने घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.

आंदोलनात विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “शिवाजी महाराजांचा जयघोष” करत सर्वांनी एकजूट दर्शविली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.