सामाजिक | मतदारसंघाच्या सीमा ओलांडून 'विजय दादां'ची माणुसकी;गरजू आदिवासी माऊलीला 'समर्थ फाउंडेशन'चा मोठा आधार
कष्टकऱ्यांचे शासकीय ओळखपत्र काढण्यासाठी खेड तालुक्यात विशेष प्रयत्न
"राजकारण आणि मतदारसंघाच्या सीमा केवळ निवडणुकीपुरत्या असतात, मात्र माणुसकीची सीमा अथांग असते," याचाच प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत भावुक घटना समोर आली आहे. खेड-आळंदी मतदारसंघात नसलेल्या, परंतु तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या 'वहागाव' येथील अत्यंत हताश आणि गरजू वृद्ध आदिवासी माऊलीला खेड बाजार समितीचे सभापती ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'समर्थ फाउंडेशन'च्या माध्यमातून घर बांधण्यासाठी तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील वहागाव येथील ठाकर वस्तीवर भिवा राघू पवार आणि चांगुणाबाई भिवा पवार हे आदिवासी दांपत्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडीत राहत आहे. वर्षानुवर्षे केलेल्या कष्टामुळे सौ. चांगुणाबाई यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने तांत्रिक कारणांमुळे त्यांचे आजपर्यंत शासकीय ओळखपत्र निघू शकले नाही. परिणामी, हे कुटुंब रेशनिंग आणि इतर सर्व प्रकारच्या शासकीय योजनांपासून पूर्णपणे वंचित राहिले होते. ही लोकशाहीतील एक मोठी शोकांतिका समोर आली होती.
संवेदनशीलतेचे दर्शन आणि तातडीची मदत -
ही बाब समोर येताच, संवेदनशील नेतृत्व ॲड. विजयसिंह (दादा) शिंदे पाटील यांनी तत्परतेने पावले उचलत समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देऊन हक्काचे घर उभारण्यासाठी मोठा आधार दिला.
या प्रसंगातून कष्टकऱ्यांच्या ओळखपत्राचा एक गंभीर प्रश्न समोर आल्याने, सभापती विजय दादा शिंदे पाटील यांनी तालुक्यात अशा सर्व कष्टकरी बांधवांसाठी विशेष शासकीय कॅम्प आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. ज्यांचे ठसे येत नाहीत, त्यांचे आयरीस (डोळ्यांचे स्कॅनिंग) किंवा इतर पर्यायी तांत्रिक मार्गांनी ओळखपत्र बनवून त्यांचे हक्क मिळवून दिले जातील. यासंदर्भात महसूल प्रशासनाशी देखील चर्चा झाली असून, विशेष बाब म्हणून या कुटुंबाला सर्व शासकीय लाभ मिळवून दिले जाणार आहेत.
माणुसकीच्या नात्याने आम्ही तिथे पोहचले -
"वहागाव आपल्या मतदारसंघात येत नसले तरी तिथली माऊली आपलीच आहे. कष्टकऱ्यांच्या हाताची झीज झाल्यामुळे त्यांचे ओळखपत्र न निघणे आणि ते योजनांपासून वंचित राहणे हा अन्याय आहे. यापुढे तालुक्यातील अशा एकाही कष्टकऱ्याला ओळखपत्राअभावी वंचित राहू देणार नाही; लवकरच तालुक्यात यासाठी विशेष मोहीम राबवू." — ॲड. विजयसिंह शिंदे पाटील (सभापती,खेड बाजार समिती तथा जिल्हा परिषद सदस्य )