सरपंच संदिप पवार यांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार; सावरदरी गावाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

 0
सरपंच संदिप पवार यांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार; सावरदरी गावाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

खेड (पुणे) : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात सावरदरी गावचे सरपंच संदिप पवार यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान पद्मभूषण प्राप्त सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सिंह शेट्टी आणि सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते प्रणव मिश्रा यांच्या हस्ते पवार यांना देण्यात आला.

संदिप पवार यांचा हा सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिगत कार्याचा गौरव नसून संपूर्ण पुणे जिल्हा आणि सावरदरी गावासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार दिला जातो.

* संघर्षातून यशाकडे प्रवास -

सरपंच संदिप पवार यांचा प्रवास नेहमीच संघर्षमय राहिला आहे.कोणताही राजकीय वारसा नसताना,त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर समाजात स्थान निर्माण केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक सामान्य जनतेच्या समस्या सोडविल्या आणि त्यांना न्याय मिळवून दिला.त्यांच्या सामाजिक जाणिवा,पारदर्शक नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी बिनविरोध सरपंचपदासाठी निवडले.

* सावरदरी गावात नावीन्यपूर्ण उपक्रम -

सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.गावाच्या डिजिटलीकरणावर भर देत त्यांनी स्मार्ट ग्राम संकल्पना पुढे रेटली.महिलांच्या सक्षमीकरणासाठी "होम मिनिस्टर कार्यक्रम" राबवून अनेक महिलांना व्यासपीठ आणि पुरस्कार दिले.बैलगाडा शर्यतींसाठी "सरपंच केसरी" स्पर्धा आयोजित करून पारंपरिक खेळाला नवा उत्साह दिला.या सर्व उपक्रमांमुळे पवार यांचे कार्य केवळ त्यांच्या गावापुरते सीमित राहिले नाही, तर पुणे जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणा ठरले आहे.

* पुरस्काराने आनंदाचा माहोल -

सरपंच संदिप पवार यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच पुणे जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमी,राजकीय नेते,विविध पक्षांचे कार्यकर्ते,तरुण वर्ग,महिला आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. गावात पवार यांचे सत्कार आणि अभिनंदन करण्यात येत आहे.सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

* सरपंच संदिप पवार यांची प्रतिक्रिया -

“हा पुरस्कार माझा नाही,तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे.हा सन्मान माझ्यावर नव्हे तर संपूर्ण समाजावर आहे. भविष्यातही असेच सामाजिक कार्य करत राहणार आहे.”

* माजी आदर्श सरपंच भरत तरस

“सरपंच संदीप पवार यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या रूपाने आमच्यापैकीच एक कार्यकर्ता आज राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झाला,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”सरपंच संदिप पवार यांचा हा गौरव सावरदरी गावासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा हा सन्मान भविष्यातील अनेक नव्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल,हे निश्चित.