दादांनी दिलेला शब्द वहिनींनी पाळला; ‘सक्षम लोकप्रतिनिधी’चे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन
सामाजिक | “जिल्हा परिषद निवडणूक झाली की तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी स्वतंत्र वेळ देतो; आपण चांगला कार्यक्रम करू,”असा शब्द माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांना दिलेल्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘सक्षम लोकप्रतिनिधी - सर्वांगीण ग्रामविकास’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले.
मागील काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांची जिजाई निवासस्थानी झालेल्या भेटीत अजितदादांना पुस्तकाची प्रत देण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी प्रकाशनासाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या कार्यालयाने पुस्तकाच्या काही प्रती मागवून घेतल्या होत्या; मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे प्रकाशनाचा कार्यक्रम राहून गेला.
दरम्यान, नुकत्याच निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी पुस्तकाची मागणी केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून संपर्क साधण्यात आला. “दादांनी दिलेला शब्द पूर्ण व्हायलाच हवा. हे पुस्तक नव्याने निवडून आलेल्या सदस्यांपर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी भूमिका वहिनींनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींनी शरद बुट्टे पाटील यांना सहकुटुंब बोलावून पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी अजितदादांना दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेखही चर्चेत झाला.दादांनी पाटोदा गावाला भेट देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपणही तेथे जाणार असल्याचे सुनेत्रावहिनींनी सांगितले.
वैयक्तिक दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही शासकीय बैठका, राज्यभर दौरे, नागरिकांच्या भेटीगाठी आणि महत्त्वाचे निर्णय यामध्ये सक्रिय राहून दादांनी उभे केलेल्या कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य म्हणजे सुनेत्रावहिनींना साथ देणे,” अशी भावना कार्यक्रमानंतर व्यक्त करण्यात आली.