स्वयंपाक गॅसचा मुबलक पुरवठा करा;खेड काँग्रेसची मागणी

गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या उन्हात लागतात रांगा;तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

 0
स्वयंपाक गॅसचा मुबलक पुरवठा करा;खेड काँग्रेसची मागणी

सामाजिक | स्वयंपाक गॅसच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असून गॅस सिलिंडरचा दर कमी करावा तसेच खेड (जिल्हा पुणे ) तालुक्यात गॅसचा मुबलक पुरवठा करावा, या मागण्यांसाठी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. १३) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

खेड तालुक्यात विविध राज्यांमधून तसेच जिल्हा व इतर तालुक्यांतून कामानिमित्त, नोकरीनिमित्त व व्यवसायासाठी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून सर्वसामान्य नागरिकांना दोन-दोन दिवस रांगेत उभे राहूनही स्वयंपाक गॅस मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता खेडसाठी विशेष कोट्यातून स्वयंपाक गॅस उपलब्ध करून देण्यात यावा तसेच गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य वंदना सातपुते, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जमीर काझी, किसान काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष सुभाष होले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव तुळवे, संभाजी मोहिते तसेच खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सोपान गोरे पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.