चाकणमध्ये भारत गॅस वितरणाचा गोंधळ; ग्राहकांची उन्हात सिलिंडरसाठी प्रतीक्षा
सामाजिक | चाकण शहरातील पुणे–नाशिक महामार्गावरील सिग्मा भारत गॅस एजन्सीसमोर गुरुवारी (दि. १२) दुपारी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एजन्सीकडून घरपोच गॅस वितरण सेवा बंद केल्यामुळे सुमारे ५०० हून अधिक ग्राहकांना रस्त्यावर लांबलचक रांगेत उभे राहून गॅस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. दुपारच्या कडक उन्हात महिला व पुरुष ग्राहक रस्त्यावर थांबलेले दिसून आले.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी गॅस सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत होता. मात्र सध्या सिलिंडरचा दर ९१६ रुपयांपर्यंत वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच घरपोच वितरणासाठी पूर्वी ८५५ रुपये घेतले जात होते, मात्र आता एजन्सीवर सिलिंडर घेताना अतिरिक्त ६० रुपये आकारले जात असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एमआयडीसीतील कामगारांची गैरसोय
चाकण एमआयडीसी परिसरातील अनेक कामगारांना कामावर जाण्याऐवजी गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची हजेरी बुडण्याची वेळ येत आहे. “उन्हात तासन्तास उभे राहावे लागते, तरीही सिलिंडर मिळेल की नाही याची खात्री नाही,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
घरपोच सेवा बंद?
एजन्सीकडून नियमित दिली जाणारी घरपोच गॅस वितरण सेवा सध्या बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वतः एजन्सीसमोर येऊन सिलिंडर घ्यावा लागत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परिणामी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
सामान्य नागरिकांना उन्हात रांगेत उभे करून सेवा देणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गॅस वितरणातील गोंधळ, अतिरिक्त शुल्क आकारणी आणि घरपोच सेवा बंद असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा दुहेरी फटका बसत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी चाकण परिसरातील नागरिकांनी केली आहे.