कंपनीची भिंत बांधकाम करताना कोसळून दाम्पत्याचा मृत्यू;बांधकाम कामगारांवर काळाचा घाला
क्राइम | चाकण औद्योगिक क्षेत्राच्या लगतच्या तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरातील एका कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या वॉल कंपाऊंडची भिंत कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत आणखी एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तळवडे ज्योतिबा नगर येथील जागा मालक सदाशिव आगळे यांनी त्यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या प्लॉटभोवती विटांचे वॉल कंपाऊंड बांधण्याचे काम दीपक देवाजी जाधव (रा. चाकण) यांना कंत्राटावर दिले होते. या कामासाठी जाधव यांनी लेबर नाक्यावरून काही मजुरांना कामावर घेतले होते.
या मजुरांमध्ये सचिन शंकर राठोड (वय ३०, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. लोहा, जि. नांदेड) व त्यांची पत्नी कोमल सचिन राठोड (वय २५, मूळ रा. लोहा, जि. नांदेड) तसेच मनोहर भिकू चव्हाण (वय ३८, रा. गाडगे आळी, चाकण) यांचा समावेश होता.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास हे मजूर वॉल कंपाऊंडचे बांधकाम करीत असताना अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेत सचिन राठोड व कोमल राठोड या दाम्पत्यावर भिंत कोसळून ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर मनोहर चव्हाण हे किरकोळ जखमी झाले.
जखमी मनोहर चव्हाण यांना उपचारासाठी देहूगाव येथील इम्पेरियल हॉस्पिटल, चिखली येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत पती-पत्नीचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले असून शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना पाळल्या जातात का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.