अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास चाकण पोलिसांनी केले जेरबंद

चाकण ( पुणे ) : शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता.खेड) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नराधम आरोपी आसिम मुलाणी (वय. २६ वर्षे, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) याने पीडित अल्पवयीन मुलीवर १६ डिसेंबर २०२४ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे. त्याच अनुषंगाने आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबदस्तीने शरीर संबंध ठेवून झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत होता.
शनिवारी (दि. २६) पीडित मुलीला "तुझा वाढदिवस साजरा करतो" असे म्हणून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेवून तेथेही नराधम आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शरीर संबंध ठेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी शेलपिंपळगावात पसरताच गावातील तरुणांनी आरोपीस चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच वेळीच चाकण पोलिसांनी हस्तक्षेप करून आरोपीस ताब्यात घेवून अटक केली आहे.पुढील तपास चाकण ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत.