गावाची जत्रा पुढारी सतरा नाटकाचा प्रयोग सादर; गावखेड्यातील खंडित झालेली नाटकाची परंपरा पुनर्जीवित

 0
गावाची जत्रा पुढारी सतरा नाटकाचा प्रयोग सादर; गावखेड्यातील खंडित झालेली नाटकाची परंपरा पुनर्जीवित

चाकण ( पुणे ) : गावाची यात्रा - जत्रा म्हटलं की गावातले हौशी तरुण एकत्र येऊन नाटक सादर करायची.परंतु काळाच्या ओघात वर्षानुवर्षे गावांमध्ये सुरू नाटकाची असलेली परंपरा लुप्त गेली.परंतु ही परंपरा दिपक मांडेकर यांच्या वडवानल प्रोडक्शन यांनी पुनरुज्जीवित करण्याचे ठरवले आणि त्याच संकल्पनेतून गावाची जत्रा पुढारी सतरा या नाटकाचा जन्म झाला.नुकताच या नाटकाचा दुसरा प्रयोग भांबोली (ता.खेड ) गावाच्या यात्रेनिमित्त पार पडला. 

  गावाची जत्रा पुढारी सतरा अतिशय खुमासदार आणि विनोदी शैलीचे,ग्रामीण भाषेतील,तुफान विनोदी नाटक आहे.या नाटकात भांबोली गावचे सर्व तरुण कलाकार काम करत होते.नाटक सादर होत असताना टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या.नाटकातील धमाल विनोदी तंट्या आणि घंट्या या जोडगोळीची विनोदाची फटकेबाजी, उत्तम नृत्याचा नमुना असलेल्या लावण्या,गावच्या आजी माजी सरपंचांच्या कुरघोड्या,बेवड्या डुल्याच्या करामतींनी या नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.यापूर्वीही चाकणजवळील रानूबाईमळा येथे गावकऱ्यांकडून असाच प्रतिसाद मिळाला होता. 

भांबोली नाट्य - चित्रपट कलाकार सागर निखाडे यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांना एकत्र करून या धमाल नाटकाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.गावच्या भैरवनाथाच्या यात्रेत हे नाटक सादर करण्यात आले.यावेळी आजूबाजूच्या गावासह पाहुणे आणि नाट्यरसिक असे हजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.

भांबोली गावचे सरपंच काळूराम पिंजन यांनी नाटक पाहिल्यावर या नाटकाचा प्रयोग नाट्यगृहात करण्यासाठीचा सर्व खर्च करण्याची ग्वाही दिली.अनेक ग्रामस्थांनी नाटकाला रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली. 

 * हे फक्त नाटक नाही यामधून तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यातून सुटून महिना भर नाटकाच्या तालमीत रंगली,यातून नवीन कलाकार उदयाला येतात.येवढच नाही तर गावातील गट तट विसरून तरुण एकत्र राहून गावात सलोखाही तयार होतो.नाटक ही सामाजिक प्रक्रिया आहे.ग्रामीण भागातील गावांमध्ये नाट्य परंपरा - चळवळ अशीच वाढत गेली तर पुन्हा प्रत्येक गावात गावचे नाटक आणि कलाकार घडत जातील. - दिपक मांडेकर,नाट्य लेखक.