रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चाकण शहरात तरुणाचा खून

चाकण ( पुणे ) : एकत्र नशापान करताना झालेल्या बाचाबाचीतून रेकॉर्डवरील दोन अल्पवयीन सराईतांनी तीस वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत डोक्यात दारूची बाटली मारून खून केल्याची धक्कादायक घटना चाकण शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
अरविंद रामप्रकाश राजे(वय.३० वर्षे,रा.चाकण, गुडलक हॉटेलच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत, ता.खेड,जि,पुणे,मूळ रा.मस्तुरा,ता.भितरवाड, जि.ग्वाल्हेर,राज्य मध्यप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन अल्पवयीन मुले ही (दि.३० ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चाकण शहरातील पुणे नाशिक महामार्गावरील समाधान हॉटेलच्या मागील बाजूच्या झाडाखाली नशापान करत असताना त्यांच्या तोंड ओळखीचा असलेला अरविंद राजे हा तिथे गेला.तिघांनी मिळून एकत्र नशा करत असताना,अरविंद हा दोन्ही मुलांना शिवीगाळ करू लागल्याने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले.दोन्ही अल्पवयीन मुलांनी अरविंदला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यातील एका अल्पवयीन मुलाने जवळच पडलेल्या लाकडाने अरविंद यास बेदम मारहाण केली. तर एका अल्पवयीन मुलाने अरविंदच्या डोक्यात दारूची बातमी मारली. यात अरविंद बेशुद्ध पडल्याने घाबरून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी अरविंदला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळील विहिरीजवळ आडोशाला ओढत नेवून टाकले व दोन्ही आरोपी घटनास्थळापासून पसारा झाले.
दरम्यान अरविंद यांने आपल्या पत्नीला सकाळी सहा वाजता कामावर सोडल्यावर दुपारी दोन वाजता न्यायला आला नाही किंवा तसा फोन ही केला नसल्याने पत्नीला शंका आल्याने पत्नीने थेट चाकण पोलीस ठाणे गाठले.पती बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगत असताना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाने खून झालेल्या तरुणाच्या पत्नीला सांगितले की,तुमचे पतीकडून आम्हाला मारहाण होऊ लागल्याने आम्ही देखील त्याला मारहाण केली.त्यात ते बेशुद्ध पडले.या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे करत आहेत.