आळंदीतील अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था ४८ तासांत बंद करा - रुपाली चाकणकर

 0
आळंदीतील अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था ४८ तासांत बंद करा - रुपाली चाकणकर

आळंदी ( पुणे ) : तीर्थक्षेत्र आळंदीत अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था वाढल्या असून या वारकरी शिक्षण संस्थांत अलीकडे बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे देखील वाढत असून आळंदीचे नाव बदनाम होत असल्याने आळंदी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महिला आयोगाने आळंदी पोलीस स्टेशन मध्ये तातडीने बैठक घेतली. या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधूंन येत्या ४८ तासांत सर्व अनधिकृत संस्था तात्काळ बंद करून तसा अहवाल आयोगास सादर करण्याचे आदेश दिले.

    यावेळी खेडचे प्रांत अनिल दौन्डे,तहसीलदार ज्योती कदम,परिमंडळ तीन चे सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार,आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,मंडलाधिकारी राजेंद्र वाघ,माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले,माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पानसरे आदींसह आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 आळंदीत बाल लैंगिक अत्याचार वाढल्याने आळंदी ग्रामस्थानी महिला आयोगासह इतर प्रशासकीय ठिकाणी निवेदन देऊन लक्ष वेधले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तात्काळ आळंदीस भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेत सुसंवाद साधला. अशा घटना आणि अशा संस्था यांना पाठीशी घालणार नसल्याचे सांगत आळंदीत झालेल्या घटनांचा आढावा माहिती घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा आळंदीत जोपासली जाते. येथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देत संबंधित सर्व संस्था बंद करण्याचे सूचना केल्या.अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करण्याची मागणी देखील आळंदी ग्रामस्थांनी केली.त्या म्हणाल्या येत्या ४८ तासात सर्व अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करुन बंद करण्याचे आदेश त्यांनी यावेळी पोलिसांना दिले.कारवाईत करण्यात कसूर केल्यास संबंधीतावर देखील कारवाई केली जाईल असे महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

यापूर्वी घडलेल्या घटनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.