आठ माथाडी कामगारांना न्याय;पुन्हा कामावर घेण्याचे आदेश

आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश

 0
आठ माथाडी कामगारांना न्याय;पुन्हा कामावर घेण्याचे आदेश

चाकण (पुणे) : पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळांतर्गत (नोकरीचे नियमन व कल्याण) योजनेची अंमलबजावणी मे. ह्युंदाई अभियांत्रिकी प्लास्टिक इंडिया प्रा. लि., आय.पी.-२७, निमगाव इंडस्ट्रियल एरिया, खेड सिटी येथे होत नसल्याची तक्रार कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. तसेच मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या प्रकरणी नोंदणीकृत कष्टकरी कामगारांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीराजे ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनने आमदार सुरेश धस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यानंतर आमदार धस यांनी या विषयाची गंभीर दखल घेत कामगार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

आमदार धस यांच्या मागणीनुसार २० मे रोजी कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे सभासद असलेल्या आठ कामगारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कामगारांच्या बाजूने आमदार सुरेश धस यांनी ठाम भूमिका घेतली. तळागाळातील कष्टकरी आणि गरजू कामगारांची बाजू प्रभावीपणे मांडत त्यांनी संबंधित प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आठ कामगारांना पुन्हा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबद्दल प्रतीक कैलास शितोळे (देशमुख) अध्यक्ष,छत्रपती संभाजीराजे ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन, संबंधित आस्थापनेतील आठ नोंदणीकृत कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि आमदार सुरेश धस यांचे आभार व्यक्त केले आहेत. संघटनेने याला कष्टकरी कामगारांच्या न्यायाच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण विजय असल्याची भावना व्यक्त केली.