'चाकण ट्रॅफिक मुक्त' आंदोलनाचा शिल्पकार हरपला

रावसाहेब ऊर्फ बाबू नाणेकर काळाच्या पडद्याआड

 0
'चाकण ट्रॅफिक मुक्त' आंदोलनाचा शिल्पकार हरपला

समाजात राहून समाजासाठी झटणारी माणसं कमीच असतात, त्यातही हसतमुख चेहरा आणि मदतीला सदैव तत्पर असणारा 'बाबू' हरवल्याची बातमी ऐकून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. नाणेकरवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे खेड उपतालुका प्रमुख रावसाहेब उर्फ बाबू नाणेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक धडाडीचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लोकनेता आपल्यातून निघून गेला आहे.

मैलाचा दगड ठरले 'चाकण ट्रॅफिक मुक्त' आंदोलन..

बाबू नाणेकर म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर ते चाकण परिसराच्या विकासाचे एक चालते-बोलते स्वप्न होते. चाकणकरांना सतावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या महाभयंकर समस्येविरुद्ध त्यांनी उभारलेले आंदोलन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केवळ खुर्चीत बसून आदेश देणारे ते नेते नव्हते, तर स्वतः रस्त्यावर उतरून, उन्हातान्हात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणारा तो एक खंदा योद्धा होता. त्यांच्या या लढ्यामुळेच आज अनेकजण त्यांना 'चाकणचा खरा जनसेवक' म्हणून ओळखतात.

एक हरहुन्नरी युवा नेतृत्व...

​नाणेकरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी अनेक विकासात्मक कामांचा पाया रचला. गावात राबवलेली विविध कामे त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. राजकारण ही त्यांच्यासाठी समाजसेवेची एक शिडी होती. अत्यंत तरुण वयात त्यांनी कमावलेली लोकप्रियता आणि जनसामान्यांशी जोडलेली नाळ ही त्यांच्या निस्वार्थी स्वभावाचे फळ होते.

परिसरात पसरली शोककळा...

​"काही माणसं स्वतःसाठी जगत नाहीत, ती समाजासाठी जगतात... अशी माणसं कधीच मरत नाहीत, ती कायम आपल्या स्मरणात राहतात," हे त्यांच्याबद्दलचे शब्द आज तंतोतंत खरे ठरत आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सहकार्याना आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. अनेकांचे अश्रू थांबत नाहीत, तर काही सहकारी "आम्ही एक खंबीर आधार गमावला," असे म्हणत भावूक झाले आहेत.

त्यांच्या जाण्याने नाणेकरवाडीसह संपूर्ण चाकण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. एक उमदा, कष्टाळू आणि प्रामाणिक युवा सहकारी काळाच्या पडद्याआड गेल्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. लोकन्याय मराठीकडून या कर्तव्यदक्ष योद्धाला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली!