हुतात्मा राजगुरूंचा शहीद दिन ‘शासकीय’ व्हावा; जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटलांची मागणी
सामाजिक | क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या शौर्यगाथेला योग्य मान मिळावा, यासाठी त्यांच्या शहीद दिनाला महाराष्ट्रात ‘शासकीय’ दर्जा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी पुणे जिल्हा परिषद गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
राजगुरूनगर (ता. खेड ) येथे आयोजित शहीद दिन कार्यक्रमात बोलताना शिंदे पाटील यांनी ही भूमिका मांडली. पंजाब राज्यात शहीद दिन मोठ्या उत्साहात शासनाच्या सहभागाने साजरा केला जातो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा दिवस अधिकृतरित्या साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
* शासकीय प्रोटोकॉलची मागणी -
राजगुरूनगर येथे होणाऱ्या जयंती व शहीद दिन कार्यक्रमांना शासकीय प्रोटोकॉल मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली. “जुन्नर येथील शिवजयंती उत्सव किंवा वढू बुद्रुक येथील कार्यक्रमांप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा उपस्थित राहते. त्याचप्रमाणे राजगुरूनगर येथील कार्यक्रमांनाही तोच दर्जा मिळावा,” असे शिंदे पाटील यांनी स्पष्ट केले. हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून शासकीय सोहळ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
* स्मारकाचा अभिमान; अधिकृत मानवंदनेची अपेक्षा -
मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरूंचे स्मारक असणे ही राज्यासाठी गौरवाची बाब असली, तरी त्यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या कार्यक्रमांना अधिकृत मानवंदना मिळणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास खेड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच समर्थ फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे पाटील यांच्या या पुढाकाराचे स्वागत होत असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.