चाकण उत्तर पोलीसांची दमदार कामगिरी; २३.८४ लाखांचा मुद्देमाल मालकांना परत
क्राईम | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशनने विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत तब्बल २३ लाख ८४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो संबंधित मूळ मालकांना परत केला आहे. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकली तसेच हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. (दि. २३ मार्च) रोजी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हा मुद्देमाल तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने सन २०२४ ते २०२६ या कालावधीत विविध गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने (किंमत ९ लाख ९४ हजार ६३० रुपये), दोन मोटारसायकली (१ लाख २० हजार रुपये) आणि १५ मोबाईल फोन (२ लाख ६३ हजार रुपये) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे) व बसवराज तेली (प्रादेशिक), पोलीस उपआयुक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस कर्मचारी पवन आहेरकर, महेश कोळी, दैवशाला वारे आदींनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या कामगिरीमुळे चाकण परिसरात पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.