चाकण परिसरात ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम | चाकण परिसरातील ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिनेमॅटिक स्टाईलमध्ये पाठलाग करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ५ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून चोरीचा माल विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण-काळूस रोडवरील राक्षेवाडी येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. काही वेळातच संशयित कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही चालकाने गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस हवालदार यादव, ढमढेरे आणि शिपाई कोळी यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यात लाकडी ओंडका टाकून वाहन अडवले.
यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता डिकीत ऑईलने माखलेल्या तांब्याच्या तारा आणि अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ (वय २७, रा. निमगाव दावडी, ता. खेड) आणि सुनील राजाराम गावडे (वय २२, रा. निमगाव दावडी, ता. खेड) या दोघांना अटक केली आहे.
चौकशीत आरोपींनी काळूस, शेलपिंपळगाव, भोसे, संतोषनगर आणि वाकी परिसरातून ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. तसेच पंचांसमक्ष चोरलेला माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा कलम १३६ अंतर्गत दाखल असलेले चार गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, एएसआय शिंदे, हवालदार यादव, ढमढेरे, कोळेकर तसेच पोलीस शिपाई लोखंडे, कोळी आणि जगझाप यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.