खेड तालुक्यात गॅसचा काळाबाजार? नागरिकांचा सवाल; प्रशासन मात्र ‘तुटवडा नाही’ म्हणतंय

 0
खेड तालुक्यात गॅसचा काळाबाजार? नागरिकांचा सवाल; प्रशासन मात्र ‘तुटवडा नाही’ म्हणतंय

सामाजिक | खेड तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर येत असताना खेड तालुक्यात अशी कोणतीही नेमणूक झाली आहे का ? याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,घरगुती वापरासाठी मिळणारा सुमारे ९१७ रुपयांचा गॅस सिलेंडर काही ठिकाणी २,५०० रुपयांपर्यंत विकला जात असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः काही हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याचे बोलले जात असून सर्वसामान्य नागरिक मात्र गॅस मिळावा म्हणून रात्रंदिवस तासन्‌तास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र चाकण परिसरात दिसून येत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून मात्र “गॅसचा कोणताही तुटवडा नाही” असा दावा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, जर तुटवडा नाही तर काळ्या बाजारात सिलेंडर सहज कसा उपलब्ध होतो?

काही ठिकाणी गॅसचे बेकायदेशीर रिफिलिंग करून किरकोळ विक्रीसाठी तब्बल ४०० रुपये प्रति किलोप्रमाणे पैसे आकारले जात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्या कामगार वर्गावर मोठा आर्थिक ताण पडत असून काहींनी परिस्थितीला कंटाळून मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून गॅसच्या काळाबाजारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यात गॅस वितरणाची नेमकी स्थिती काय आहे, काळाबाजार रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आणि निरीक्षकांची नेमणूक झाली आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.