चाकण - आंबेठाण मार्गावरील अवजड वाहतूक बिरदवडी ते पुणे नाशिक महामार्ग वळवण्याची मागणी

चाकण (पुणे) : चाकण - आंबेठाण रस्त्यावरील वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी अवजड वाहनांना वेळ मर्यादा ठरवून अशी वाहने बिरदवडी मार्गे भाम येथील पुणे नाशिक महामार्गाला सोडावीत अशी मागणी चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष राम गोरे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मोबिन काझी,अनिल देशमुख,दत्तात्रय चौधरी,दिलावर आतार आदींनी चाकण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड यांना दिलेल्या निवेदनात प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याची मागणी केली आहे.
चाकण - आंबेठाण रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.ही अवजड वाहतूक वासुली - आंबेठाण - बिरदवडी ते भाम या मार्गाने पुणे नाशिक महामार्गावर सकाळी सात ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सोडावीत.तसेच बिरदवडी चौक - आंबेठाण चौक ते पुणे नाशिक महामार्ग ते भाम चौक या तिन्ही ठिकाणी चक्राकार पद्धतीने जड वाहनांची एकरी पद्धतीने वाहतूक सुरू करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत वरिष्ठाचे मार्गदर्शन घेऊन पुढील दोन तीन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे चाकण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितले.