जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; बालचिमुकल्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
चाकण (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पठारवाडी (ता.खेड) येथे निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि CRY यांच्या संयुक्त विद्यमाने चाईल्ड रिसोर्स अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकांच्या कलागुणांना वाव देत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण जनजागृती रॅलीने झाली.यावेळी बालचिमुकल्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. स्वागतगीत, भाषणे, नाटिका, चित्रकला, घोषवाक्य लेखन, वृक्षारोपण तसेच ‘झाडे लावा - झाडे जगवा’ अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
आरोही पठारे, तनिष्का पठारे, जय आल्हाट, साई शिंदे, अन्वी पठारे आणि अदिती पठारे यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद करणारी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि नाटिकांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला.
‘झाडे लावा - झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा - जीवन वाचवा’ यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मुलांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत निसर्ग संवर्धनासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी गावडे, वैशाली पठारे आणि तृप्ती जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवक, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी गावडे यांनी केले, तर शौर्य पठारे याने उपस्थित पालक व मान्यवरांचे आभार मानले.